युपीएससी मी आणि तुम्ही - अन्सार शेख
युपीएससी मी आणि तुम्ही अर्थात युपीएससी बद्दल सर्व काही हे पुस्तक लिहून अन्सार शेख यांनी महाराष्ट्रातील मुलांची उत्तम सोय केली आहे. अन्सार शेख हे वयाच्या २१ व्या पहिल्या प्रयत्नात आणि ते सुद्धा मराठी माध्यम घेऊन परीक्षा पास झाले. महाराष्ट्रात एक इतिहास घडला.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेलगाव सारख्या एका छोट्या गावातून एक मुलगा शिक्षणासाठी पुण्याला येतो काय आणि युपीएससी पास होतो काय हे स्वप्नवत आहे. त्याचे स्वप्न आणि त्याची जिद्द यांची कहाणी म्हणजे हे २८० पृष्ठांचे पुस्तक. युनिक अॅकॅडमीने मुलांची उत्तम सोय या निमित्ताने केली आहे. एकूण चौदा प्रकरणांमधून लेखकाने आपली ही यशोगाथा मांडली आहे. लेखकाचे आयुष्य, त्याचा संघर्ष, समकालीन घटना आणि परीक्षा हे सगळेच वास्तव आपणास या पुस्तकातून समजते.
हे पुस्तक कोणी वाचावे ? खरं म्हणजे हे पुस्तक कोणीही वाचावे. युपीएससीला न बसणाऱ्या मुला - मुलींनी सुद्धा हे पुस्तक वाचावे असेच आहे. ही यशोगाथा परीक्षेपुरती मर्यादित नाही तर आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी आहे. व्यक्तिगत जीवनातील दुःखे बाजूला ठेवून यशाकडे झेप कशी घ्यायची याचा हा ओनामा आहे. सलग तीन वर्षे केवळ एकाच विषयाला वाहून घेण्याची प्रवृत्ती अन्सरला उपयोगी पडली. सध्याच्या भोवतालच्या परिस्थितीशी तोंड देताना स्वतःची एकाग्रता कशी ढळू द्यायची नाही हे अंगी राबवायचे असेल तर प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असायलाच हवे. मी हे पुस्तक एका बैठकीत वाचून काढले.
तुम्ही कधी वाचणार ?
पृ. २८० मुल्य – २०० रु
प्रा. डॉ. गणेश राऊत
about 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago
over 4 years ago