Loader
दैत्यालय

दैत्यालय


(सर्व कर समावेश)

Rs. 180

माहिती

प्रस्तावना

नव्या जगात गूढ वसतं का? जुन्या जगात ते ठासून भरलं होतं. कारण त्या जगात विज्ञान नव्हतं. नव्या जगात विज्ञानासोबत तंत्रज्ञान आलं. माहितीची क्रांती झाली. मानवी मनावर मिडियाची अधिसत्ता वाढली. त्यामुळे मानवी जाणीव आणि नेणीव आत्मनिष्ठ न राहाता झुंडनिष्ठ झाली. ज्या जगात जगणं म्हणजे ’रियालिटी शो’ आणि अनुभव म्हणजे ’टुरीझम’ होतं त्या जगात अंगावर काटा आणणारं, छातीत धडकी भरवणारं भय वसतं का ?
’दैत्यालय’ आणि ’नशकाप्रमराश्री’ ह्या दोन दीर्घ भयकथांचे लेखक ह्रषीकेश गुप्ते म्हणतील, हो, वसतं. कारण माणसाने कितीही आधुनिक किंवा उत्तरआधुनिक होण्याचा दावा केला तरी माणूस आदिम प्राणी आहे. प्राणी म्हटलं की भय आलं. गूढ आलं. हिंसा आली आणि मानवी मनातल्या दैत्यांचा नाच सुद्धा आलाच. ’जगताना उजेडापेक्षा अंधाराचं तात्त्विक मोल अधिक आहे’ असं सूचवणारे ह्रषीकेश गुप्ते भय आणि गूढ ह्या दोन प्राथमिक प्रेरणांचं भयकथेच्या माध्यमातून उत्खनन करतात. त्याचे निष्कर्ष वेधक आहेत.
जागतिक साहित्यात भयकथांना सर्वोच्च स्थान नाही, पण मानाचं जरूर आहे. भय ही जैविक, म्हणून प्राथमिक प्रेरणा आहे. तिचा अप्रतिहत अंमल मानवी जाणीवेवर असतो. मग हा माणूस खेड्याच्या अंधार्‍या पायवाटेवर चाचपडत असो, की गप्पकन दिवे गेलेल्या महानगरी हमरस्त्यावर. भयकथांचं अपील अशा अंधारात शोधता येतं.
मराठीत भयकथांची समृद्ध परंपरा आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी ’पारंब्यांचे जग’ लिहिणारे नारायण धारप. नंतरचे रत्नाकर मतकरी, भारत सासणे इत्यादींच्या पंक्तीत ह्रषीकेश गुप्ते बसतात. त्यांच्यासाठी भय, गूढ, विस्मय आणि माणसाचे कुठलेही मनोव्यवहार निषिद्ध नाहीत. सोडियम व्हेपरच्या चकाचौंद प्रकाशात सारं महानगर न्हाऊन निघताना ह्रषीकेश मात्र एकाकी इमारतींच्या जिन्यांमधला आणि मानवी मनातला अंधार शोधतात आणि त्याद्वारे आपल्या कथांमधून केवळ भयच नव्हे तर त्या भयाची कारणमिमांसा सुद्धा करतात.
भयाला वास्तव समजून जगभरात अभिजात भयकथा लिहिल्या गेल्या. काळ बदलला. भयाला भय न समजता त्याचा अज्ञानाशी संबंध लावून भयाची विरचना करण्याचा नवा काळ आला. सायकॉलॉजी आणि सायकियाट्रीच्या विकासानंतर भयाला मानवी मनाचा विभ्रम समजलं गेलं. ह्या भयाचं विश्‍लेषण करणार्‍या आधुनिक लेखकांमध्ये ह्रषीकेश गुप्त्यांचा समावेश होतो. त्यांच्या ह्या पूर्वीच्या ’अंधारवारी’ ह्या भयकथा संग्रहात सुद्धा भयाच्या मानसिकतेची उलगड करण्याची आकांक्षा दिसून येते.
रोमँटिसिझमच्या तत्त्वदर्शनानुसार भय ही अस्सल आणि करकरित मानवी प्रेरणा आहे. भयाचा बाऊ न करता त्यातल्या सौंदर्यवादी घटकांची कदर करणार्‍या अनेक लेखकांना भयतत्त्वाने भुलवलं. जर्मन लेखक इ.टी.ए. हॉफमन किंवा अमेरिकन लेखक एडगर अ‍ॅलन पो ह्या तत्त्वदर्शनाचे एकोणिसाव्या शतकातले महान प्रवक्ते होते.
’खरा चित्रकार कोण? हाती ब्रश घेतलेला माणूस , की ज्या कॅनव्हासवर तो चित्र काढतो तो कॅनव्हास?’ असा गूढ प्रश्‍न विचारणारी ह्रषीकेश गुप्त्यांची ’दैत्यालय’ ही कादंबरीका कॅनव्हासच्या गूढ रंगसंगतीवर रचली गेली आहे. धुंडीराज खोत हे विलक्षण प्रतिभा लाभलेले चित्रकार. त्यांची विरोधाभासी रंगसंगतीची चित्रं भीषण दृष्टीभ्रम पैदा करतात असा त्यांच्यावर कलासमीक्षक आरोप करतात. थंडीत दात कडकडावे तशी कडकडणारी ही चित्रं. ह्या तैलचित्रांत असंख्य मानवी कवट्या दिसून येतात. ह्या चित्रांकडे बघताना ’कोणीतरी माझ्याकडे पाहात होतं’ असं दैत्यालयचा निवेदक म्हणतो.
ह्या लोकविलक्षण चित्रकार खोतांची किर्ती ऐकून त्यांना देशविदेशातून शिष्य मिळतात. अखेरीस ’दैत्यालय’ चा निवेदक खोतांनी चितारलेल्या कॅनव्हासच्या चेटूकात फसतो. ही उत्कंठा निर्माण करणारी भयकथा वाचताना वाचक लोणावळ्यानजिकच्या दैत्यालयाच्या परिसरात वावरतो. तिथल्या रानात भटकू लागतो, कुठे खुट्ट झालं की बिचकून बघतो, कथेत भेटणारी विलक्षण, अतर्क्य पात्रं बघून भांबावतो.
कलेला जसं उंच नेणारं एक दैवी तत्त्व असतं तसंच कलेत माणसाला गर्तेत ढकलणारं एक दैत्यतत्त्व सुद्धा वसतं असा ह्रषीकेश गुप्त्यांचा थेसिस आहे. पंच्याहत्तर पानी ’दैत्यालय’ ह्या कल्पनेभोवती विणलेली आहे. भन्नाट, तीव्र, गूढ मानसिक आवेगांना रोमँटिक तत्त्वदर्शनात महत्त्व आहे. टोकाच्या भावनांचं स्तोम माजवणार्‍या ह्या तत्त्वदर्शनाला ’काजळमाया’ सारख्या गूढ कथा लिहिणार्‍या जी.ए.कुलकर्णींने उचलून धरलं होतं. गूढकथा लिहिताना जी.एं.नी गूढाला गूढच ठेवलं. ह्रषीकेश गुप्ते मात्र गूढाची विज्ञानाच्या साहाय्याने विरचना करतात. ती करताना ते कितपत यशस्वी होतात हे कळून घ्यायला त्यांची ’दैत्यालय’ वाचणं इष्ट. गूढकथेचं कथानक सांगू नये.
अनेक अतर्क्य घटना वाचकाला ’दैत्यालयात’ भेटतात. कलेसाठी आत्महत्येच्या टोकाला जाणारे कलाकार इथे आहेत. मानवी आयुष्याचं ध्येय कुतुहल शमवणे हेच. ते करताना काही माणसं स्वतःला नष्ट करतात. ’दैत्यालय’ अशा शोकात्म उत्सुकतेची कहाणी आहे. ती वाचताना स्थलकालाचं भान हरपतं. हे लेखकाचं यश आहे.
‘कल्पना आणि वास्तवात काय फरक असतो?‘ ‘काहीच नाही. कधी कल्पना वास्तवात उतरते, तर कधी आपण वास्तवच कल्पना मानू लागतो‘. ह्या मध्यवर्ती सूत्राभोवती विणली गेलेली त्यांची ’नशकाप्रमराश्री’ ही दुसरी कादंबरिका. ही एका लेखकाच्या निवेदनातून घडते. हा निवेदक ’पॅरॉनॉईया’ आणि ’ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसऑर्डर’ ह्या मानसिक रोगांशी नीट अवगत दिसतो.
ही शंभर पानांची कादंबरिका विविध पातळींवर आकार घेते. एका पातळीवर लेखकाला कथा सुचते, दुसर्‍यावर ह्या कथेतली पात्रं प्रत्यक्ष अवतरून लेखकाला छळू लागतात. तिसर्‍या पातळीवर ही कथा भ्रम असल्याचं लेखक सूचवतो. चौथ्या पातळीवर लेखक वाचकाला नवाच धक्का देतो....
भीती आभासात्मक की सत्य? असा तात्त्विक प्रश्‍न ही कादंबरिका उपस्थित करते. स्वप्न, सत्य, अंधार, आभास, वास्तव, स्मृत्भ्रंश, मृतात्मे इत्यादीं कल्पनांचा कलात्मक वापर करत ह्रषीकेश गुप्ते वाचकांना ’नशकाप्रमराश्री’ च्या अंधार्‍या बोगद्यात घेऊन जातात. तिथे वाचक चाचपडू लागतो. तो मिट्ट अंधाराचा भाग होतो. ’मी स्वतः जरी लेखक असलो तरी मी कुणाच्या कथेतलं पात्र तर नाही?’ असा अस्वस्थ प्रश्‍न ह्या कादंबरिकेतला लेखक विचारतो.
ह्रषीकेश गुप्ते भयाची तात्त्विक मिमांसा करतात. ती करताना ते आधुनिक विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र इत्यादींचे संदर्भ देत उत्तरआधुनिक माणसाच्या आदिम भीतीला हात घालतात. आजचं मराठी साहित्य वास्तववादाचा ओव्हरडोस घेतल्यामुळे सुस्त झालं आहे. ह्रषीकेश गुप्त्यांनी ही सुस्ती टाळली. त्यांनी वास्तवाला सत्याचा केवळ एक घटक समजून जगण्यातल्या अवास्तव आणि आभासी अतर्क्यतेला चितारलं. ह्यात ते यशस्वी होतात.
ज्या मानवी अवस्थेवर साहित्य भाष्य करतं असं म्हणतात त्या अवस्थेत भीती ही जगण्याचा केवळ एक पापुद्रा आहे. भीतीयुक्त नसलेला पण चिंताक्रांत असलेला दुसरा पापुद्रा जगण्यासमोरचं आणि साहित्यासमोरचंही आव्हान आहे. भीती ढोबळ, तर चिंता सूक्ष्म भावना आहे. ’हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ सारखी भेदक कथा लिहिणारे ह्रषीकेश गुप्ते भीतीसोबतच चिंतेचं सौंदर्यशास्त्रही मान्य करतील असा विश्वास वाटतो.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.