Loader

साकेत प्रकाशन

बाबा भांड आणि आशा भांड यांनी लेखन प्रकाशनाच्या प्रेमापोटी 1975 मध्ये सुरुवातीस धारा आणि नंतर साकेत प्रकाशन सुरू केले. या काळात मुंबई-पुणे हे प्रकाशनाचे मुख्य केंद्र होते. या केंद्राबाहेर औरंगाबादसारख्या ठिकाणी सुरू केलेल्या प्रकाशनाने आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. एवढी पुस्तके प्रकाशित करणारी साकेत प्रकाशन प्रा.लि. ही मराठीतील एक प्रकाशन संस्था आहे. साकेत प्रकाशनाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे असून पुणे येथेही स्वतंत्र ग्रंथदालन सुरू आहे. कथा, कादंबरी, चरित्र, समीक्षा, बालवाङ्मय, कृषीविषयक, आरोग्य, व्यक्तिमत्त्वविकास, अध्यात्म, यथोगाथा, खेळ, तत्त्वज्ञान या विविध विषयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठीतील आजचे सर्व आघाडीचे लेखक साकेतचे मान्यवर आधारस्तंभ आहेत. त्यात भालचंद्र नेमाडे, रा.रं बोराडे, ना.धों महानोर, राजन गवस, भा.ल. भोळे, गंगाधर पानतावणे, नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रकांत पाटील, निशिकांत ठकार हे आणि अनेक नव्या दमाचे लेखक आमचे आधारस्तंभ आहेत. मराठी भाषेशिवाय इतर भाषांतून महात्मा गांधी, जे.कृष्णमूर्ती, ओशो, सत्यजित रॉय, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर.के. नारायण यांच्या पुस्तकांचे प्रकाशन. त्याचबरोबर नोबेल पारितोषिकप्राप्त ओरहन पामुक, ज्युझे सारामागु, जे.एम. कोएत्झी, गावो झिंगजियान, रुडीयार्ड किपलिंग, अल गोर आणि महमद युनूस यांच्या अनुवादाचे प्रकाशन. यासोबत आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुढील लेखकांच्या पुस्तकांचे अनुवादही प्रकाशित केले आहेत. त्यात काही मान्यवर -अ‍ॅन फँक, जे.डी.सलिंजर, रिचर्ड बाक, एरिक सेगल, किरण देसाई, हारुकी मुराकामी, नेपोलियन हिल, केनेथ ब्लॅचार्ड, जोसेफ मर्फी, एखार्ट टॉल्, रॉबिन शर्मा, दीपक चोप्रा. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या साहित्यकृतीचे अनुवाद साकेत प्रकाशनने केले आहे. साकेत ग्रंथवार्ता हे संस्थेचे मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते. याद्वारे प्रकाशित होणार्या नव्या ग्रंथाबद्दल, पुनर्मुद्रणाबद्दल अन् प्रकाशनाच्या घडामोडीबद्दल माहिती वाचकांना मिळू शकते. ग्रंथवार्ताच्या सभासदांना साकेतच्या सर्व ग्रंथावर विशेष सूट. साकेत प्रकाशन संस्थेस अनेक मान्यवर संस्थांचे विविध पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत. साकेतच्या ग्रंथास, लेखकासही अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. महाराष्ट्र शासनाने 2009 सालातील श्री.पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक म्हणून साकेत प्रकाशनाचा गौरव केला आहे. अ.भा. प्रकाशन संघटना दिल्लीचा गेली तीन वर्षं उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार.